बंगालच्या उपसागरात ‘सेन्यार’ चक्रीवादळ ; महाराष्ट्रावर काय परिणाम…मच्छिंद्र बांगर
डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा हवामान अंदाज ; दक्षिण अंदमान समुद्रामध्ये ‘वेलमार्क लो प्रेशर’ म्हणजे कमी दाबाची प्रणाली तयार झाली असून, ती लवकरच डिप्रेशनमध्ये रूपांतरित होऊन बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हवामान मॉडेलनुसार या वादळाच्या दिशेबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. ईसीएमडब्ल्यूएफ मॉडेलनुसार ते विशाखापट्टणमला धडकू शकते, तर जीएफएस मॉडेल विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यानच्या भागाची शक्यता दर्शवते. सध्या या प्रणालीच्या प्रभावामुळे केरळ, तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, दक्षिण कर्नाटक आणि रायलसीमेमध्ये मोठे पावसाळी वातावरण तयार झाले आहे. जीएफएस मॉडेलने दोन प्रणाली एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली आहे, ज्यामुळे १ डिसेंबरच्या आसपास एक अधिक शक्तिशाली वादळ तयार होऊ शकते.
महाराष्ट्राच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास, चक्रीवादळाचा मुख्य प्रभाव बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात राहील. मॉडेलनुसार, महाराष्ट्रातील केवळ गडचिरोली जिल्ह्यावर या प्रणालीचा तुरळक परिणाम होण्याची शक्यता आहे, जी अंदाजे १ डिसेंबर रोजी जाणवू शकते. दरम्यान, सध्या (२४-२५ नोव्हेंबर) अरबी समुद्रातील बाष्पामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती तयार झाली आहे.
सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरसह इतर काही भागांतही ढगाळ वातावरण दिसत आहे. या ढगाळ परिस्थितीतून एखाद-दुसऱ्या ठिकाणी २६ नोव्हेंबरपर्यंत तुरळक पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तथापि, महाराष्ट्रात सर्वदूर मोठा पाऊस मॉडेल सध्या तरी दाखवत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही.
सध्या महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण कमी झाले आहे, जी साधारणपणे २७ नोव्हेंबरपर्यंत कायम राहील. मात्र, यानंतर हवामानामध्ये मोठा बदल दिसून येईल. २७ नोव्हेंबरनंतर ढगाळ वातावरणाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल, ज्यामुळे आपोआपच २८ किंवा २९ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात थंडी वाढायला सुरुवात होईल. विदर्भाकडून थंडीची सुरुवात होऊन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (१, २, ३ डिसेंबर) थंडीची तीव्रता जोरदार असण्याची शक्यता आहे. या काळातली थंडी सुरुवातीला अल्हाददायक असेल, परंतु २८ नोव्हेंबरनंतर कडाक्याच्या थंडीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.